गेल्या दोन आठवड्यापासून राज्यातील थंडी ओसरली चालली असून गर्मीला सुरुवात झाली आहे. मार्च महिना सुरु होत नाही तोवरच ऊन आणि त्यात उकाडा वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जास्त तापमानाची नोंद झाली आहे. अशामध्ये राज्यावर पुन्हा एकदा पावसाचे सावट आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी म्हणजेच सोमवारी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसंच नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
तर, 8 मार्च म्हणजे मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या 10 जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दरम्यान पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या पावसामुळे बळीराज्याची चिंता वाढली आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक जाण्याची शक्यता आहे.