राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून (bjp) मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपची ही मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा खुलासा करतील, असा टोला लगावतानाच एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी भाजपवर केली. शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक केली. गेली 20 वर्ष ते विधानसभेत आहेत. त्या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार धरलं जातं. कारण नसताना आरोप केला जातो. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते. हे लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला चिंता करण्याचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जातेय. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या जात आहेत. जाणूनबाजून हे केलं जातंय, असं शरद पवार म्हणाले.