ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौर्यावर येत आहेत. या दौर्या दरम्यान ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासह विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या सोहळ्यासाठी महामेट्रोकडून पुणे आणि पिंपरी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850 किलोग्रॅम गन मेटलच्या 9.5 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर त्यांचे सकाळी 11.30 वाजता गरवारे मेट्रो स्थानक येथे आगमन होणार आहे. येथे मेट्रोचे उद्घाटन होईल. येथून ते पौड रोडवरील आनंदनगर स्थानकापर्यंत मेट्रो प्रवास करणार आहेत. त्यानंतर ते एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात ऑनलाइन प्रणालीद्वारे विविध विकासकामांचे उद्घाटन करतील.
याचवेळी फुगेवाडी ते पिंपरी या मेट्रोमार्गाचे उद्घाटन होईल. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणी, कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाईल. यामध्ये नदीकाठाचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल.
पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे; जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे. व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर दुपारी 1.45 वाजता पंतप्रधानांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ होईल.
असा असेल मोदींचा दौरा
सकाळी 10.25 वाजता : पुणे विमानतळावर विमानाने आगमन
11.05 वाजता : पुणे महापालिका येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
11.20 वाजता : गरवारे मेट्रो स्टेशन येथे उद्घाटनाचा कार्यक्रम
11.30 वाजता : गरवारे मेट्रो स्टेशन येथून मेट्रोने आनंदनगरकडे प्रवास
11.50 वाजता ः कोथरूड येथील एमआयटी कॉलेज येथील कार्यक्रमास उपस्थिती
दुपारी 1.45 वाजता ः सिम्बायोसिस विद्यापीठ कार्यक्रमास उपस्थिती
3.10 वाजता ः आयएएफबीजे विमानाने दिल्लीकडे प्रयाण.