ताजी बातमी ऑनलाईन टीम
चुकीच्या पद्धतीने गर्भनिरोधक (कॉपर टी) बसविल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन मिरज तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय विवाहितेचा सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली.
एका शेतमजुराची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. त्यावेळी तिला एका प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भनिरोधक (कॉपर टी) बसविण्यात आली होती.
परंतु, त्यानंतर महिलेच्या पोटात दुखू लागले आणि रक्तस्त्रावही सुरू झाला. रक्तस्त्राव थांबत नसल्याने तातडीने उपचाराठी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु, रक्तस्त्राव न थांबल्याने तिचा शनिवारी मृत्यू झाला.
या घटनेनंतर महिलेच्या सासरच्या मंडळींकडून सिव्हिल रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. मृतदेह ताब्यात घेण्यास पतीने विरोध केला. परंतु, काही राजकीय पदाधिकार्यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटविण्यात आल्याचे समजते. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.