ताजी बातमी ऑनलाईन टीम
अंबाबाईच्या मंदिरात लहान मुलांच्या प्रवेशावरील बंधने उठविली असली तरी थेट दर्शनासाठी ई-पासची सक्ती कायम आहे. आता लवकरच महाद्वारमार्गे गरुड मंडपातून मुखदर्शन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीही ई-पासची सक्ती राहणार आहे. त्यामुळे यापुढे अंबाबाईचे थेट दर्शन असो किंवा मुखदर्शन असो, ई-पास असेल तरच शक्य होणार आहे .
कोल्हापूरसह 14 जिल्हे निर्बंधमुक्त करण्यात आले. त्यामुळे अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले होणार, अशा भाविकांच्या अपेक्षा होत्या. मात्र थेट दर्शनासाठी ई-पासची अट कायम ठेवण्यात आल्याचे देवस्थान समितीने जाहीर केले. फक्त लहान मुलांना बंद करण्यात आलेला प्रवेश सुरू करण्यात आला.
जिल्हा निर्बंधमुक्त झाल्यानंतर अंबाबाई मंदिराचे चारही दरवाजे पूर्ववत उघडतील, अशी भाविकांची अपेक्षा होती. मात्र आता महाद्वार खुले करून तेथून भाविकांना गरुड मंडपात मुखदर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र हा प्रवेश नियंत्रित असेल. ज्यांच्याकडे ई-पास आहे, त्यांनाच मुखदर्शन घेता येणार आहे. तसा ई -पास आधारकार्डच्या आधारे देण्याची व्यवस्था महाद्वारात उभारल्यानंतरच महाद्वार उघडण्यात येणार आहेे.