ताजी बातमी ऑनलाईन टीम
महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरोधात विजयाचा आपला सिलसिला कायम राखला आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना युद्धापेक्षा कमी नसतो. याची भारतीय महिला संघाला कल्पना होती. त्यामुळे आज त्यांनी त्याच दर्जाचा उत्तम खेळ दाखवला. भारतीय महिला संघाच्या (Indian womens Team) वादळापुढे पाकिस्तानी महिला संघाचा निभावच लागला नाही. भारतीय संघाने तब्बल 108 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण पाकिस्तानचा डाव अवघ्या 137 धावांमध्ये आटोपला. भारतीय आणि पाकिस्तान महिला संघामधील हा 11 वा वनडे सामना होता. भारतीय महिलांनी आपला रेकॉर्ड कायम ठेवला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला नमवण्याची ही दहावी वेळ आहे. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, स्मृती मानधना आणि राजेश्वरी गायकवाड या चौघींनी पाकिस्तान विरोधातील विजयाच महत्त्वाची भूमिका बजावली. संघ अडचणीत असताना पूजा आणि स्नेहमध्ये 97 चेंडूत 122 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारताला 244 ही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर सर्वच भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. पण त्यात राजेश्वरी गायकवाड उजवी ठरली. तिने आपल्या फिरकी गोलंदाजीने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. राजेश्वरीने 10 षटकात 31 धावा देत चार विकेट घेतल्या. झुलन गोस्वामी, स्नेह राणाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीनने सर्वाधिक 30 धावा केल्या. पाकिस्तानी महिला संघ सामना जिंकू शकतो, असं एकदाही वाटलं नाही. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले.