ताजी बातमी ऑनलाईन टीम
दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) प्रत्येक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना मातीतल्या वास्तव गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत. आता हिंदीत पहिल्यांदाच त्यांनी ‘झुंड‘च्या (Jhund) निमित्ताने रुढ चौकट मोडून काढण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याची पोचपावती अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे दिली. असं असलं तरी या माऊथ पब्लिसिटीचा परिणाम मात्र बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवर होताना दिसत नाहीये. ‘झुंड’च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांच्या कमाईचा आकडा जाहीर केला आहे. मात्र हा आकडा पाहता झुंडचा प्रवास अजूनही धीम्या गतीनेच सुरू असल्याचं समजतंय. पहिला वीकेंड हा कोणत्याही चित्रपटाही अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे तिसऱ्या दिवशी तरी कमाईच्या आकड्यात वाढ व्हावी, अशी अपेक्षा तरण आदर्शने व्यक्त केली आहे.
शुक्रवार (पहिला दिवस)- 1.50 कोटी रुपये
शनिवार (दुसरा दिवस)- 2.10 कोटी रुपये
पहिल्या दोन दिवसांची एकूण कमाई- 3.60 कोटी रुपये
दुसऱ्या दिवशी मुंबई आणि महाराष्ट्रात या चित्रपटाने चांगली कमाई केली असली तरी आकडा हा कमीच असल्याचं तरण आदर्शने म्हटलं आहे. त्याचसोबत उत्तर भारतात या चित्रपटाची जादू चालू शकली नसल्याचंही त्याने निदर्शनास आणून दिलं आहे. नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.
बॉक्स ऑफिसवर झुंडला सध्या गंगुबाई काठियावाडी आणि पावनखिंड या चित्रपटांची टक्कर आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या ‘गंगुबाई काठियावाडी’ने तर बॉक्स ऑफिसवर 70 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या स्पर्धेत ‘झुंड’ला आपला वेग वाढवावा लागणार, हे निश्चित!