ताजी बातमी ऑनलाइन टीम
येत्या १५ दिवसात तज्ज्ञ समितीकडून शेतीपंपाना दिवसा १० तास वीज देण्याबाबतचा अहवाल घेऊन वीज नियामक आयोगाच्या मान्यतेने तातडीने निर्णय घेणार असल्याचा निर्णय उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रालयात झालेल्या आजच्या बैठकीत दिला.
राज्य सरकारकडून सध्याची वीजेचे वेळापत्रक व शेतीपंपास दिवसा वीज दिल्यानंतर महावितरणच्या विद्युत वहन क्षमता व आर्थिक भार याबाबतची माहिती दिली. दरम्यान उर्जामंत्री व अधिका-यांच्या नकारार्थी भुमिकेपुढे बैठकीच्या सुरवातीस संतापलेल्या राजू शेट्टी यांनी शेतक-यांना दिवसा १० तास वीज हा त्यांचा हक्क आहे. विद्युत भाराच्या विभागणीत सरकारला बळी घ्यायला शेतकरीच दिसू लागला आहे का? असा संतप्त सवाल करत राजू शेट्टी यांनी बैठकीस सुरवात केली व महावितरणला शेतक-यांना शेतीपंपास दिवसा १० तास कसे लाईट देता येईल याबाबत सविस्तर माहिती सादर केली. तसेच शेतक-यांची चुकीचे वीज बील दुरूस्त करून देण्यासाठी संपूर्ण राज्यात दुरूस्ती अभियान राबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिका-यांना दिले.
बैठकीत बोलताना राजू शेट्टी यांनी महावितरणच्या कारभाराविरुद्ध ताशेरे ओढत वीज खरेदी व इतर महावितरणच्या भानगडीवर हल्लाबोल केला. तसेच महापूर , कोरोना , दोन टप्यातील मिळणारी एफ. आर पी यामुळे राज्यातील शेतकर्यांच्या वीज बीलाच्या योजनेची मुदत ३१ मार्च रोजी संपणार आहे ती १ वर्षाने वाढवून देण्याची मागणी केली. महावितरणने नेमलेले मीटर रिडींग घेणा-या एजन्सी व कंपन्याच्या चुकारपणाचा शेतक-यांना फटका बसला असून तातडीने त्या कंपन्याऐवजी महावितरण कडून रिडींग घेण्याची मागणी केली.
जवळपास दिड तास चाललेल्या बैठकीत उर्जामंत्र्यांनी सकारात्मक भुमिका दाखवित आंदोलन १५ दिवस थांबविण्याची विनंती केली.
दरम्यान राजू शेट्टी यांनी उद्या सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर प्रमुख पदाधिकारी यांचेसोबत चर्चा करून पुढील निर्णयाची घोषणा करणार असल्याचे सांगून बैठक संपविण्यात आली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील , महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल , आमदार राजू आवळे , आमदार अरूण लाड , आमदार राजेश पाटील , आमदार ऋतुराज पाटील , प्रा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक प्रकाश पोपळे , संदीप जगताप यांचेसह पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.