ताजी बातमी ऑनलाइन टीम
आजकाल कोणत्या कारणासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. दारू (Liquor) प्यायला पैसे दिले नाही म्हणून चक्क एका कामगाराचं साहित्य चोरलं. त्यामुळे आता प्रत्येकाने सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दारू साठी पैसे नाही दिल्याने चार आरोपींनी चक्क कामगाराचं साहित्य चोरून (Theft) नेल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक (Arrest) केली असून सगळं साहित्य हस्तगत केलं आहे. सोनू गणेश वर्मा असे लुटण्यात आलेल्या कामगाराचं नाव आहे. याप्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद नोंदवण्यात आली होती.
सोनू वर्मा याने पाचपावली परिसरातील एका शाळेत नळ दुरुस्तींचं काम घेतलं होतं. त्या ठिकाणी त्याचं काम सुरू असताना चार युवक आले आणि त्यांनी काम करणाऱ्याकडे दारू पिण्यासाठी दोनशे रुपये मागितले. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला, त्यामुळे चारही जण रागावले आणि निघून गेले. मात्र काम संपल्यानंतर फिर्यादीने आपलं सगळं साहित्य काम सुरू असलेल्या शाळेच्या एका खोलीत ठेवलं आणि निघून गेला. मात्र आरोपी त्याच्यावर लक्ष ठेवून होते, त्यांनी तो जाताच लगेच शाळेचं दार तोडलं आणि सगळं साहित्य चोरून नेलं. दुसऱ्या दिवशी फिर्यादी आला असता त्याला साहित्य दिसलं नसल्याने त्याने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी परिसरात सर्च केलं असता चार आरोपी संशयास्पद स्थितीत दिसून आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या जवळील साहित्य हस्तगत करत चारही आरोपींना अटक केली.