चालत्या कारने पेट घेतल्याने चालकासह कार जळून खाक झाली. ही दुर्दैवी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात उघडकीस आली आहे. अर्टिगा कार गुरुवारी कोल्हापूरहून कणकवलीच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. यावेळी कारमध्ये चालकाच्या जागी अक्षरशः मानवी सांगाडा शिल्लक राहिला होता. कारला आग लागल्यानंतर चालकाला बाहेर पडणं शक्य न झाल्याने त्याचा जळून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात चालत्या कारने पेट घेतल्याने चालकासह कारचा जळून कोळसा झाला. मृतदेह पूर्णतः जळाला असल्याने त्याची ओळख पटू शकली नव्हती. या कारचा क्रमांक एमएच 07 एजी 6297 असून ती कणकवली येथील व्यावसायिक निलेश काणेकर यांच्या मालकीची असल्याचे समजते.
काणेकर हे काल दुपारी ही कार घेऊन राधानगरी येथे जाण्यासाठी बाहेर पडले होते. पण कार जळाली तेव्हा कोण चालवत होतं, हे समजू शकलेले नाही. मात्र तेव्हापासून निलेश काणेकर यांचा मोबाईल बंद आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे काणेकर यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन घटनास्थळीच दाखवत आहे. डीएनए टेस्ट केल्यानंतरच जळलेल्या व्यक्तीची ओळख पटू शकणार आहे.