उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला. त्यावरून भाजपने शिवसेना नेत्यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. नोटापेक्षाही शिवसेनेला कमी मते मिळाल्याचं सांगत भाजपकडून शिवसेनेला डिवचण्यात येत आहे. हे सत्य असलं तरी उत्तर प्रदेशात एका जागेवर मात्र भाजपला शिवसेनेमुळे पराभव पत्करावा लागला आहे. उत्तर प्रदेशातील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला अवघ्या 771मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराने 3 हजाराहून अधिक मते घेतली. या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार नसता तर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असता असं सूत्रं सांगत आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची जिंकण्या एवढी ताकद नसली तरी भाजपच्या उमेदवारांना पाडता येईल एवढी ताकद शिवसेना निर्माण करत असल्याचं अधोरेखित होताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपला भविष्यात आव्हान ठरू शकते असं सांगितलं जातं.
उत्तर प्रदेशातील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शैलेंद्र ऊर्फ राजू श्रीवास्तव उभे होते. या निवडणुकीत राजू श्रीवास्तव यांनी 3698 मते घेतली. या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार सईदा खातून या 84586 मते घेऊन विजयी झाल्या. तर भाजपचे उमेदवार राघवेंद्र प्रताप सिंह यांना 84095 मते मिळाली. राघवेंद्र प्रताप सिंह यांचा केवळ 771 मतांनी पराभव केला. शिवसेनेचा उमेदवार नसता तर सिंह यांच्या पारड्यात ही 3698 मते गेली असती आणि त्यांचा विजय झाला असता. मात्र, शिवसेनेने मते खाल्ल्याने त्यांचा पराभव झाल्याचं दिसून येत आहे.
राजू श्रीवास्तव यांच्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रचार केला होता. आदित्य स्वत: डुमरियागंज येथे आले होते. त्यांच्या सभेला मोठी गर्दीही होती. मात्र, ही गर्दी मतांमध्ये परावर्तीत झाली नाही. मात्र, असं असलं तरी श्रीवास्तव यांनी मते खाल्ल्याने भाजपच्या उमेदवाराला मात्र घरी बसावे लागले आहे. कालच आदित्य ठाकरे यांनीही ही तर सुरुवात आहे. आम्ही लढत राहू असं सांगितलं होतं. कोणत्याही राजकीय पक्षाची सुरुवात होते तेव्हा त्याचे डिपॉझिट जप्त होते. नंतर ते वाढत जातात. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवण्यात सातत्य ठेवू असं त्यांनी सांगितलं होतं.
शिवसेनेने उत्तर प्रदेशात 60 उमेदवार जाहीर केले होते. मात्र, 19 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने प्रत्यक्षात शिवसेनेचे 41 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. हे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. पीलीभीतमधून भूपराम गंगवार, धौराहारातून मुनेंद्र कुमार अवस्थी, श्रीनगरमधून ज्ञानप्रकाश गौतम, हुसैनगंजमधून पवन कुमार श्रीमाली, लखनऊ सेंट्रलमधून गौरव वर्मा, लखनऊ बीकेटीमधून अरविंद कुमार मिश्रा, लखनऊ पूर्व मतदार संघातून मिथिलेश सिंग, मोहम्मदीतून प्रशांत दुबे, बिस्यानमधून प्रभाकर सिंह चौहान आणि गोसाईगंजमधून पवन कुमार आदी उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.