युक्रेन वरील हल्ल्यामुळे जगातील सर्व देश आणि कंपन्यांकडून रशियावर दबाव आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. दरम्यान, अनेक मोठ्या कंपन्यांनी रशियाबरोबरचा व्यवसाय बंद केला आहे, तर अनेक कंपन्या युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यामध्ये फेसबुक पुन्हा एकदा पुढे आले आहे. एका अहवालानुसार, फेसबुकने रशियन हल्ल्याविरोधात हिंसक भाषेला परवानगी देणारे नियम शिथिल केले आहेत.
फेसबुकच्या धोरणानुसार, या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारचे द्वेषपूर्ण भाषण, हिंसक किंवा आक्षेपार्ह भाषेला परवानगी नाही. फेसबुकवर अशा गोष्टींवर बंदी आहे, पण युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी फेसबुकने आता यासंबंधिचे नियम शिथिल केले आहेत. यामुळे लोक उघडपणे रशियाविरुद्ध बोलू शकतील आणि विरोध करू शकतील.
याआधी फेसबुकने रशियामध्ये अनेक कडक निर्बंध लादले होते. यानंतर रशियाने फेसबुकवर कडक कारवाई करत फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली. रशियाची सेन्सॉरशिप एजन्सी Roskomnadzor ने फेसबुकवर रशियन मीडियाशी भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.
फेसबुकने रशियाच्या कारवाईवर म्हटले आहे की, रशिया आपल्या लाखो लोकांना विश्वसनीय माहितीपासून वंचित ठेवत आहे. फेसबुकवर बंदी घातल्यानंतर रशियाने ट्विटरवरही कारवाई केली. फेसबुकशिवाय रशियन सरकारने ट्विटरवर काही दिवसांपूर्वी बंदी घातली होती.




