विद्येच्या माहेरघरात काय चाललंय असाच प्रश्न तुम्हाला ही बातमी पाहून पडेल. कारण ही बातमीच तशी आहे. सध्या पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील या घटनेमुळं विद्येचं माहेरघर पुरतं हादरलं आहे.
बिबवेवाडीतील पुण्याच्या क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
फी भरण्याच्या वादावरून मुख्याध्यापकांनीच पालकांना मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलाची शाळेची फी भरण्यावरून संबंधित पालक आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मारहाण करण्यात आली.
पालकांना शाळेतच मारहाण झाल्याने ही घटना नेमकी किती गंभीर आहे हे कळत आहे. सर्वांना धक्का देणाऱ्या या घटनेप्रकरणी मयुरेश गायकवाड यांनी तक्रार केली असून, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पालक फक्त निवेदन करण्यासाठी शाळेत आले होते. कोरोना संकटांमुळे त्रस्त पालकांनी फीसंदर्भात शाळेनं दिलासा देण्यासाठीचं निवेदन करण्यासाठी शाळेची वाट धरली.
पण, पालकांचं काहीही न ऐकून घेता मुख्याध्यापकांनी थेट बाऊंसर अंगावर सोडले अशी प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. मुळात शाळेसाठी बाऊंसर ही संकल्पनाच पूर्णपणे चुकीची असल्याचा सूरही काही पालकांनी आळवला.
हा काही पब आहे का, लहान मुलांच्या एका संस्थेमध्ये बाऊंसर कोण ठेवतं असा संतप्त सवाल काहींनी केला. कायद्याच्या मार्गानं फी बाबत दिलासा देण्यासाठी पालक आर्जव करताना शालेय प्रशासनाची अशी वागणूक आक्षेपार्ह असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं.