गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेला अवकाळी पावसाचा मुक्काम राज्यातील विविध भागांमध्ये वाढतच आहे. आतापर्यंत अवकाळीने उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागांमध्ये हजेरी लावली असताना आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे तर काही भागात पिकांची काढणी झाली आहे. खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होणार का एकच सवाल आता शेतकऱ्यांच्या मनात आहे. शनिवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
शाळा पुन्हा ऑनलाइन, काय आहे नेमकं कारण?
गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाच्या सरी ह्या बरसत आहेत. त्यामुळे फळबागांचे तर नुकसान झालेलेच आहे पण द्राक्ष तोडणी सुरु असतानाच होत असलेल्या पावसामुळे थेट घडावर परिणाम होत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून अवकाळीची सुरु झालेली अवकृपी अंतिम टप्प्यातही कायम आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आतापर्यंत ढगाळ वातावरणच होते. पण शुक्रवारी मध्यरात्री सोलापूरसह पुणे, चाकण परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. शिवाय आता मराठवाड्यातही शनिवारी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मात्र, आता याच ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आहेत. काही भागात पिकांची काढणी कामे सुरु आहेत तर काही ठिकाणी पीक काढून वावरात आहे.
मराठवाड्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा तासाला वेग 30 ते 40 किमी असणार आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.