ताजी बातमी ऑनलाइन टीम
रशिया-युक्रेन युध्दाचा (Russia-Ukraine war) दुष्परिणाम हळूहळू भारतात दिसू लागला आहे. मागील काही दिवसांत तेलाच्या दरात भरमसाट वाढ होत असताना आता इंधन व खतांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या युध्दाचा कृषी क्षेत्रावरही मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येते. रशिया आणि बेलारूसमधून भारतात पोटॅश व फॉस्फरच्या कच्चा मालाची आयात केली जाते. मात्र, युध्द सुरू झाल्यानंतर मालाच्या आयातीत अडथळे निर्माण झाल्याने पोटॅश व फॉस्फरयुक्त खतांचे दर वाढणार असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
रशिया-युक्रेन युध्दामुळे जगभरातील आर्थिक घडी विस्कटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. या युध्दामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. रशिया, युक्रेन, बेलारूस यासारख्या देशांमधून भारतात कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात केला जातो. यामध्ये भारतात खतांच्या एकूण आयातीपैकी जवळपास १२ ते १५ टक्के आयात रशिया आणि बेलारूसमधून होते. त्यामुळे, या युद्धाचा परिणाम खतांच्या आयातीवरही होऊ शकतो. रशिया या देशात खतनिर्मितीचे मोठमोठे कारखानेही आहेत. तसेच खतनिर्मितीत जगभरात रशिया या देशाचा चौथा क्रमांक लागतो. रशिया आणि बेलारूस पोटॅशचे मोठे निर्यातदार देश आहेत. युक्रेनही पोटॅशची निर्यात करतो. त्यामुळे युक्रेन-रशिया युद्धामुळे पोटॅशचा पुरवठा होणे कठीण झाल्याने पुढील काही दिवसांत खतांचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.