ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रेमाचं एक असं अनोखं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी महिला घर सोडून उत्तर प्रदेशातून बिहारमध्ये पळून गेली. ऑनलाईन गेम PUBG खेळता-खेळता उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील एका महिलेचं बिहारच्या मुजफ्फरपूरच्या एका युवकावर मन जडलं. प्रेमात ती इतकी वेडी झाली की विवाहित महिला आपलं घर आणि कुटुंब सोडून प्रियकराला भेटण्यासाठी बिहारच्या मुजफ्फरपूर येथे पोहोचली . इकडे घरातील लोक महिलेचा शोध घेत होते तर दुसरीकडे प्रियकराला भेटण्यासाठी उतावळी झालेली महिला राज्य सोडून फरार झाली होती.
ही घटना श्यामदेउरवा ठाण्याच्या हद्दीतील आहे. यात एक विवाहित महिला 3 मार्चला आपल्या ( प्रियकराला भेटण्यासाठी मुजफ्फरपूर ठाण्याच्या सिव्हिल लाईन्समध्ये गेली. PUBG गेम खेळत असतानाच तिचं या व्यक्तीवर प्रेम जडलं. इकडे ती गायब झाल्याचं समजताच एकच गोंधळ उडाला. सगळीकडे महिलेचा शोध घेतला गेला. मात्र काहीच पत्ता न लागल्याने तिच्या घरच्यांनी श्यामदेउरवा ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना सर्विलान्स टीमची मदत घ्यावी लागली. पोलिसांना बेपत्ता महिलेचं लोकेशन मुजफ्फरपूरच्या सिव्हिल लाईन्समध्ये दिसलं. यानंतर पोलिसांनी बिहार पोलिसांसोबत संपर्क साधला आणि महिलेला मुजफ्फरपूर येथील ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, 3 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू होतं, तेव्हाच घरात एकटी असल्याने फायदा घेत महिला घरातून फरार झाली. यादरम्यान घरातील इतर सदस्य मतदानासाठी गेले होते.