ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली-आष्टा रस्त्यावर कसबेडिग्रज फाट्याजवळ शिक्षक शिवाजी यशवंत ढोले यांच्यासह त्यांच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणार्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. एका अल्पवयीन युवकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली. यामध्ये बागणीमधील एका राजकीय नेत्याच्या मुलाचा देखील समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य संशयित सूत्रधार समीर युसूफ पखाली (वय 40, वाठार, ता. हातकणंगले, मूळ गाव बागणी), अल्झार युनूस चौगुले (32, रा. बागणी, ता. वाळवा), तोहिद ऊर्फ बबलू राजू मुलाणी (31, रा. वाठार), जुबेर अहमद अल्लाउद्दीन चौगुले (35, रा. बागणी) आणि प्रमोद महादेव कांबळे (वय 40, रा. इचलकरंजी) यांचा समावेश आहे. समीर पखाली हा सराईत असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
उपअधीक्षक टिके म्हणाले, शिवाजी ढोले हे बुधवारी (दि. 16) रात्री साडेदहाच्या सुमारास मुलगा पियूष याच्यासह बुलेटवरून कसबे डिग्रजकडून आष्ट्याकडे निघाले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. कार आडवी मारुन त्यांना थांबविण्यात आले.
त्यानंतर संशयितांनी दोघांच्या अंगावर गुलाल टाकला. याबाबत ढोले यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना “गुलाल कसला आहे ते सांगतो चल”, असे म्हणून पिता-पुत्रांना मारहाण केली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून चाकू, सुरा व चॉपरचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दोघांना रात्रभर कारमधून ठिकठिकाणी फिरविले. त्यानंतर त्यांना माले (जि. कोल्हापूर) येथे घेऊन गेले. तेथे दोन खोल्यांमध्ये त्यांना ठेवले. तिथे बेदम मारहाण करून 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. दरम्यान संशयितांचे काही साथीदार बागणी गावातील ढोले यांच्या कुटुंबाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. ढोले यांच्या पत्नीने पोलिसात धाव घेतल्याची कुणकुण संशयितांना लागल्याने दोघांकडे असलेली 22 हजार 500 रुपयांची रोकड घेवून त्यांना माणकापूर येथे सोडून देण्यात आले होते.
ढोले यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरू लागली. उपअधीक्षक टिके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकासह सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, विश्रामबागचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या पथकला तातडीने कारवाईच्या सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विविध पोलिस ठाण्यांच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून आणखी काही जणांची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.