ताजी बातमी ऑनलाईन टीम
जोपर्यंत आई-वडील हयात आहेत, तोपर्यंत मुलाला त्यांच्या मालमत्ते (Property)वर कोणताही हक्क सांगता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court)ने एका प्रकरणात दिला आहे. आजारी पतीच्या उपचार खर्च उभा करण्यासाठी महिलेने पतीच्या नावावरील फ्लॅट विकायचे ठरवले. तिच्या या निर्णयाला मुलाने विरोध केल्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने मुलाचा दावा फेटाळून लावत त्याला मोठा दणका दिला आणि याचिकाकर्त्या महिलेला दिलासा दिला. तिला पतीचा फ्लॅट विकण्यास परवानगी दिली.
आजारी पतीचा फ्लॅट विकू इच्छिणाऱ्या महिलेच्या याचिकेवर सुनावणी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्या सोनिया खान यांनी त्यांच्या पतीची मालमत्ता विकायचे ठरवले होते. मात्र त्यांच्या या निर्णयाला मुलाने विरोध केला होता. सोनिया खान यांना पतीच्या सर्व संपत्तीचे कायदेशीर पालक बनायचे होते. त्यांचा पती अनेक दिवसांपासून आजारी आहे. पण सोनिया यांच्या याचिकेला मुलगा आसिफ खानने विरोध केला. वडिलांचा फ्लॅट विकण्याच्या निर्णयावर त्याने आक्षेप घेतला. आजारी पित्याचा उपचार खर्च उचलण्यासाठी आईकडे इतर पर्याय आहेत. यासाठी फ्लॅट विकण्याची गरज नाही, असे म्हणणे आसिफच्या वकिलांनी मांडले. या युक्तिवादातून आसिफची द्वेषभावना दिसून आली आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पतीची संपत्ती विकण्यास याचिकाकर्त्या सोनिया यांना परवानगी दिली. हा निकाल मुलगा असिफसाठी मोठा दणका देणारा ठरला आहे.
वडिलांचा फ्लॅट विकण्यास विरोध करणाऱ्या मुलाला फटकारले
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील मुलाची चांगलीच कानउघाडणी केली. आसिफने आपल्या वडिलांची कधी काळजी घेतली हे सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत एकही कागदपत्र सादर केलेले नाही. न्यायालयाने आसिफचे सर्व दावे तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत आई-वडील हयात आहेत, तोपर्यंत मुले आईवडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतात, असे वारसा हक्क कायद्यात कुठेही लिहिलेले नाही, असेही न्यायालयाने यावेळी सुनावले. आई जिवंत आहे, वडील जिवंत आहेत. अशा स्थितीत नात्याने मुलगा असलात तरी तुमचा वडिलांच्या मालमत्तेवर शून्य हक्क आहे. वडिलांना त्यांची मालमत्ता विकण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही. ते त्यांची मालमत्ता विकू शकतात. समजले का, अशा शब्दांत मुलाची कानउघाडणी करीत न्यायालयाने मुलाचा वडिलांच्या मालमत्तेवरील दावा मान्य करण्यास नकार दिला