आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात सतत होत असलेल्या चढ-उतारीचा परिणाम भारतातील इंधन दरावर सुद्धा होत आहे. याचाच परिणाम म्हणून भारतामध्ये डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. आधी विमानासाठी लागणाऱ्या इंधनामध्ये दरवाढ करण्यात आली होती आता घाऊक प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या ग्रहाकांसाठी 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. पण या दरवाढीचा परिणाम पेट्रोल पंपावरुन (Petrol Pump) वाहनांमध्ये डिझेल खरेदी करणाऱ्या ग्रहाकांवर होणार नाही. त्यामुळे किरकोळ ग्राहकांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) तोटा कमी करण्यासाठी तेल कंपन्यांनी डिझेलच्या खरेदीवर प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे घाऊक ग्राहकांना आता डिझेलसाठी प्रति लिटर 25 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ फक्त मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्यांसाठी आहे. म्हणजेच बस ऑपरेटर्स आणि मॉल्समध्ये वापरासाठी डिझेल खरेदी करणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे या डिझेल दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार नाही. त्यांना आहे त्याच दरामध्ये डिझेल खरेदी करता येणार आहे.