बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर असानी चक्रीवादळामध्ये झाले आहे. हे असानी चक्रीवादळ रविवारी अंदमान-निकोबारच्या बेटावर येऊन धडकले आहे. 2022 वर्षातले हे पहिले चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता हवामान खात्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचसोबत या वादळामुळे किनारपट्टी भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढचे काही तास खूपच महत्वाचे असणार असल्याचे हवामान खात्याने (IMD Alert) सांगितले आहे. या वादळामुळे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र पूर्व आणि ईशान्येकडे सरकले आहे. रविवारी हे वादळ आणखी तीव्र झाले असून त्याचे रुपांतर असानी चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ रविवारी अंदमान बेटांवर धडकले असून बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. हे चक्रीवादळ 12 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. या वादळामुळे पोर्ट ब्लेअर आणि आसपासच्या बेटांदरम्यान चालवल्या जाणाऱ्या सर्व जहाजांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. तसेच या वादळात कोणी प्रवासी अडकले तर त्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
अंदमान आणि निकोबारनंतर हे वादळ उत्तरेकडे सरकू शकते असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. रविवारी या वादळाची तीव्रता अधिक होती. सोमवारी म्हणजे आज त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. हे वादळ 22 मार्च रोजी उत्तर दिशेने पुढे सरकून म्यानमार-दक्षिण-पूर्व बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे 22 मार्चपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात बोट घेऊन जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.