आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. चीनमध्ये एक प्रवासी विमान कोसळ्याची घटना घडली आहे. स्थानिक चीनी मीडियाच्या वृत्तानुसार हे विमान क्वानमिंगहून ग्वांगझूला जात असताना गुआंग्झी भागात कोसळले. या विमानात 133 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. विमान अपघातामुळे येथील डोंगराला आग लागली. अपघात झालेले विमान चायना इस्टर्न एअरलाइन्सचे बोइंग 737 विमान होते अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात किती जण जखमी झाले आहेत किंवा किती प्रवासी सुखरूप आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
स्थानिक माध्यमांनी विमानतळ कर्माचऱ्यांचा हवाला देत दिलेल्या रिपोर्टनुसार, सोमवारी दुपारी 1:00 वाजता कुनमिंग शहरातून उड्डाण केल्यानंतर चीन इस्टर्न फ्लाइट MU5735 ग्वांगझूमधील नियोजित ठिकाणी पोहोचले नाही. दरम्यान, एएफपीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु चीन इस्टर्नकडून त्वरित प्रतिसाद मिळाला नाही.
चीनच्या एअरलाइन उद्योगाचा सुरक्षितता रेकॉर्ड गेल्या दशकात जगातील सर्वोत्कृष्ट राहिला आहे. एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कनुसार चीनचा शेवटचा जेट अपघात 2010 मध्ये झाला होता. तेव्हा हेनान एअरलाइन्सचे एम्ब्रेर ई-190 प्रादेशिक जेट कमी दृश्यमानतेत यिचुन विमानतळाकडे जाताना क्रॅश झाले होते. या दुर्घटनेत विमानतील 96 पैकी 44 जणांचा मृत्यू झाला होता.