मोबाईल वापरण्यास देण्याच्या कारणावरून झालेल्या सन्मुख कांबळे याच्या खूनप्रकरणी दुर्गाप्पा बाबासाहेब जंगम (वय 33, रा. उत्तर शिवाजीनगर, नवीन वसाहत, सांगली) याला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आरोपी जंगम आणि मृत कांबळे व अन्य आठ ते दहा कामगार तासगाव येथील बेदाणा शेडच्या बांधकामावर काम करीत होते. त्यावेळी त्यांच्यात मोबाईल वापरण्यास देण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर सन्मुख हा रात्री जेवण करून झोपला असताना आरोपी दुर्गाप्पाने सन्मुखच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून केला.
या घटनेनंतर तेथील कामगार संतोष गौतम कांबळे यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. विश्राम मदने यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार गणपत माने यांची साक्ष व वैद्यकीय पुराव हा महत्वाचा ठरला. तसेच इतर साक्षीदारांनी दिलेला पुरावा गृहित धरुन भा. दं. वि. कलम 302 अन्वये आरोपी दुर्गाप्पा जंगम याला दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली.