ताजी बातमी ऑनलाइन टीम
कौटुंबिक वादातून एका तरुणाने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात एक्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित रेल्वे पोलिसाने जीव धोक्यात घालून या तरुणाला रेल्वे रुळातून बाजूला केलं. आज दुपारी अडीच वाजता विठ्ठलवाडी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 1 वर घटना घडली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालेली आहे कुमार गुरुनाथ पुजारी (18) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो प्रेमनगर टेकडी, उल्हासनगर येथे राहणारा आहे. तर ऋषिकेश चंद्रकांत माने असं तरुणाला वाचवणाऱ्या जीआरपी जवानाचं नाव आहे. कौटुंबिक वादविवादातून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळते.
रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे तरुण बचावला
कुमार गुरुनाथ पुजारी हा उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात राहणारा आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कुमार पुजारी हा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येऊन उभा राहिला. यावेळी कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस भरधाव वेगात येताना पाहून कुमार याने अचानक रेल्वे रुळात उडी मारली आणि एक्सप्रेस समोर उभा राहिला. ही बाब तिथल्या रेल्वे पोलिसांना दिसताच येताच रेल्वे पोलिसांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत उडी घेतली आणि या तरुणाला रुळातून बाजूला केले.
ऋषिकेश चंद्रकांत माने असे या तरुणाला वाचवणाऱ्या रेल्वे पोलिस जवानाचे नाव असून त्यांच्या धाडसाचे यानंतर कौतुक होत आहे. दरम्यान, कुमार पुजारी याने कौटुंबिक वादविवादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.