ताजी बातमी ऑनलाईन टीम
अतिवृष्टी दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई (Compensation) मिळवून देण्यासाठी एका महिला तलाठी (Talathi)ने 15 हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे. या महिला तलाठीने आपल्या एका मदतनीसच्या मार्फत ही लाच स्वीकारताना लाटलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. अनंत कंटे असे लाच स्वीकारणाऱ्याचे नाव आहे. तर अमृता बडगुजर असे महिला तलाठीचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी महिला तलाठीविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
फिर्यादीचे अतिवृष्टीमुळे गाळ्याचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी तलाठी अमृता बडगुजर यांनी फिर्यादीकडे 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच बडगुजर यांनी त्यांचा मदतनीस अनंत कंटे याच्यामार्फत तलाठी सजा शहाड कार्यालय येथे स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.
कल्याणमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे आणि दुकानांचे नुकसान झाले होते
कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे आणि दुकानदारांचे दुकानाचे नुकसान झाले होते. सरकारकडून या ठिकाणी पंचनामे करण्यात आले होते. कल्याण तहसील कार्यालयाने हे पंचनामे केले होते. ज्या लोकांचे नुकसान झाले होते. त्यांना मोबदला देण्यात आला होता. कांबा परिसरातील एका व्यक्तीच्या गाळ्याचे नुकसान झाले होते. या व्यक्तिला पंचनाम्यानंतर मोबदला मिळाला. हा मोबदला मिळवून देण्याच्या बदल्यात कल्याण तहसील कार्यालयातील महिला तलाठीने पंधरा हजार रुपये मागितले होते. या पैशाची तडजोड कांबा येथे राहणारा अनंत कंटे या व्यक्तीने केली होती.
अटक इसम कंटे हा सरकारी कामातील मध्यस्थ
कंटे हा कल्याण पश्चिमेतील तलाठी कार्यालयात काम करतो. तो एक खाजगी इसम आहे. तो सरकारी कामात मध्यस्थी करतो. फिर्यादी ठरल्याप्रमाणे कंटेला आज पंधरा हजार रुपये देणार होता. फिर्यादीने या व्यवहाराची माहिती ठाणे लाच लुचपत पथकाला दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून कंटेला रंगेहाथ पकडले. ठाणे कार्यालयाचे उपायुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरिक्षक पल्लवी ढोके पाटील यांनी सापळा रचून ही कारवाई केली. तलाठी कार्यालयात पंधरा हजार रुपये घेताना अनंत कंटे याला ताब्यात घेतले. कंटे याने महिला तलाठी अमृता बडगुजर यांच्यासाठी हे पैसे मागितल्याची कबुली दिली. पोलिसानी कंटेला ताब्यात घेत अमृता बडगुजर यांचा शोध सुरु केला आहे.