ताजी बातमी ऑनलाईन टीम
उत्तर पोटनिवडणुकीसाठी बुधवारी काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज(candidate application) दाखल केला. तर विरोधात भाजपचे सत्यजित कदम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनावर भर देत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांनी प्रचाराचा धुरळा उडाला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या दि. १२ एप्रिल रोजी मतदान तर दि.१६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अंतिम दिवस असल्याने, आजच प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यावर भर दिला. महाविकास आघाडीच्या वतीने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रमुख विरोधी भाजपकडून २०१४ चे काँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान श्रीमती जाधव यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्याकडे दाखल केला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.