पंढरपूर येथील अल्पवयीन मुलीला माता बनवून तिघे पुरुष जातीचे अपत्य रस्त्यावर फेकून पलायन करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. तसेच सदर अल्पवयीन मुलीसह तिच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण उर्फ भैय्या शशिकांत दावणे व दत्ता परमेश्वर खरे या दोन तरुणांना अटक करण्यात आली होती आणि तिसऱ्याचा शोध सुरु होता. दरम्यान तिसरा आरोपी विशाल टापरे याला पोलिसांनी कराड येथून आज सकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून देखील आणखी बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.
फुलचिंचोली येथील अविनाश नागनाथ वसेकर हे त्यांच्या कुंटुबासह शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चालले होते. यावेळी नारायण चिंचोली गावच्या पाण्याच्या टाकीच्या समोर त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले होते. वसेकर यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा शोध घेतला असता अल्पवयीन पिडीत मुलीबरोबर तिघांनी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यामुळे त्या मुलाचा पिता कोण हे ठरवणे मुश्किल झाले आहे. तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर तिघांनी आत्याचार केले आहेत. त्यामुळे जन्मलेल्या आणि फेकून दिलेल्या बाळाचा नेमका पिता कोण हा प्रश्न सध्या कायम असून डीएनए तपासणीतून याचे उत्तर मिळणार आहे. त्यासाठी बाळ, अल्पवयीन माता आणि अत्याचारी दोन आरोपींचे नमुने घेवून डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता तिसरा आरोपीही सापडला असून त्याचेही नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.