ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर शहरातील क्रेशर चौकातील एका बिअर बारमध्ये चार जणांनी बार मॅनेजरला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी काचेची बाटली डोक्यात मारून बार मॅनेजरला रक्तबंबाळ केलं आहे. संबंधित आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी परमिट रूम बिअर बारच्या काचा फोडून हॉटेलचं मोठं नुकसान केलं आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
सौरभ राजाराम कांबळे (वय-23) आणि सौरभ दीपक कांबळे (वय-22) असं गुन्हा असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीटर आणि जॉन नावाच्या अन्य दोन तरुणांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना कोल्हापुरातील क्रेशर चौकातील रॉयल रुफ बेअर बार, परमीट रुममध्ये घडली आहे.
घटनेच्या दिवशी सोमवारी रात्री आरोपी पीटर, जॉन (पूर्ण नावे माहीत नाहीत), सौरभ राजाराम कांबळे आणि सौरभ दीपक कांबळे दारू पिण्यासाठी रॉयल रुफ बिअर बारमध्ये आले होते. दारू प्यायल्यानंतर बिल देण्यावरून दौघांनी बार व्यवस्थापक लक्ष्मण कोंडिबा पाणकर (23, चाफेवाडी, ता. पन्हाळा) याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. या वादावादीनंतर आरोपींनी पाणकर याला दमदाटी करत शिवीगाळ केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पाणकर यांच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. तसेच बिअर बारच्या काचेच्या खिडक्या फोडून नुकसान केलं.
सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. बिल देण्यावरून हुज्जत घालून बिअर बारची तोडफोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत.