ताजी बातमी ऑनलाईन टीम
एका पाठोपाठ एक स्फोट होण्याची दृश्य गेल्या काही काळापासून फक्त युक्रेनमध्येच दिसून येत होती. मात्र महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील स्फोटाच्या घटनेनं सगळ्यांना हारवलं आहे. प्रथमदर्शनी हा युक्रेनमधलाच व्हिडीओ (Ukraine Blast video) आहे की काय, अशी शंका कुणालाही येऊ शकेल. मात्र हा व्हिडीओ पुण्यातील कात्रज (Pune Katraj Blast) परिसरातला आहे. पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले. सिलिंडरच्या स्फोटांनी कात्रज परिसर हादरुन गेला आहे. धडकी भरवणारे स्फोटाचे आवाज या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहेत. या स्फोटाच्या आवाजांनी संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. नेमका हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र या स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय.
कात्रजमध्ये नेमके कुठे झाले स्फोट?
कात्रजमधील गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट होत असून अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. या स्फोटांनी या परिसरात खळबळ माजली आहे. या स्फोटात किती हानी झाली आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
व्हिडीओमध्ये आगीचा भडका!
कात्रजमध्ये झालेल्या या व्हिडीओमध्ये एका घरातच सिलिंडरचा ब्लास्ट झाला असल्याचं दिसून आलं आहे. यानंतर लगेचच एकामागून एक स्फोटाचे आवाज ऐकू आले. यात आगीचे प्रचंड मोठे लोळ व्हिडीओमध्ये दिसून आले आहेत. या घटनेने आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरुन गेला होता.
या आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. दरम्यान, या आगीमध्ये जीवितहानी झाली आहे का, याचीही माहिती अद्याप मिळू शकलेली. सध्या या संपूर्ण परिसरात आग नियंत्रणात आणण्यासाठी बचावकार्य सुरु असल्याचं कळतंय. या आगीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा असा आहे.