केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज झालेल्या मार्च महिन्यातील शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करून 34 टक्के डीएला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारासोबतच वाढीव डीएचा लाभ दिला जाणार आहे. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 ची थकबाकी देखील मिळणार आहे. नवीन महागाई भत्ता 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.
केंद्रीय कर्मचार्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत (March 2022 salary) नवीन महागाई भत्त्यासह (DA) संपूर्ण रक्कम दिली जाईल. परंतु थकबाकीची रक्कम नंतर जमा केली जाऊ शकते. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्त्यात (Dearness allowance) 3 टक्क्यांनी वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए वाढून आता 34 टक्के झाला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 ते 56,900 रुपये आहे. त्यामुळे 34 टक्के नवीन महागाई भत्ता 56,900 रुपयांच्या कमाल मूळ पगारावर दिला मोजला तर 19,346 रुपये प्रति महिना डीए होतो. तर आतापर्यंत जो डीए देण्यात आला आहे तो 31 टक्क्याने 17,639 रुपये प्रति महिना दिला गेला. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरमहा 1,707 रुपयांनी वाढ झाली आहे. आपण ही वाढ वार्षिक ग्रहित धरली तर ती 20,484 रुपये एवढी असेल. कर्मचाऱ्यांना आता जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 या 2 महिन्यांची थकबाकी मार्च महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे एका कर्मचाऱ्यालाही 38,692 रुपये थकबाकी मिळेल.
कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला?
कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये ग्रहित धरून महागाई भत्त्याची थकबाकी मोजली तर सध्या त्यांना 31 टक्क्याने 5,580 रुपये डीए मिळत आहे. मात्र आता त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासून 6,120 रुपये डीए मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात 540 रुपयांची वाढ होईल. तसेच जानेवारी आणि फेरब्रुवारी या 2 महिन्यांची थकबाकी सुमारे 1,080 रुपये होते. ही डीए थकबाकी देखील मार्चमध्ये मिळणार आहे.