Friday, June 21, 2024
Homeसांगलीसांगलीतील महिला डॉक्टराला लुटणारी टोळी गजाआड

सांगलीतील महिला डॉक्टराला लुटणारी टोळी गजाआड


येथे तीन चोरट्यांनी वृद्ध महिला डॉक्टरांच्या घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी एका महिलेसह पाचजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा लाखांचे सोन्याचे दागिने, चार दुचाकी, मोबाईल, कोयता असा 7 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली.
अमित चंद्रकांत पाचोरे (वय 28, रा. नांद्रे), सचिन शिवाजी फोंडे (27, नांद्रे), रोहित देवगोंडा पाटील (23, रा. वसगडे), निखिल राजाराम पाटील (31, रा. खटाव, ता. पलूस), पायल युवराज पाटील (31, चांदणी चौक, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, की डॉ. नलिनी महारुद्र नाडकर्णी (वय 87) या घरात एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा शिवानंद हा कुटुंबीयांसह वारणाली येथे राहतो. वयोमानामुळे सध्या डॉ. नाडकर्णी या वैद्यकीय प्रॅक्टिस करीत नाहीत. दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी त्या घरी एकट्याच होत्या. दाराची बेल वाजली. त्यांना मुख्य दरवाजाजवळ एक मुलगा बाहेर दिसला. त्याने उपचार घ्यायचा आहे, असे सांगितले. नाडकर्णी यांनी सध्या हॉस्पिटल बंद असल्याचे सांगून निघून जाण्यास सांगितले. तो मुलगा घराबाहेर लोखंडी गेट बंद न करताच निघून गेला. नाडकर्णी या लोखंडी गेट बंद करण्यासाठी बाहेर गेल्या असता दोन चोरट्यांनी त्यांना पकडले. त्यांना घराच्या हॉलमध्ये आणले. तोपर्यंत तिसरा चोरटाही घरात शिरला.


एकाने त्यांच्या गळ्याला धारदार कोयता लावून कपाट्याच्या चाव्या मागितल्या. नाडकर्णी यांनी नकार दिला. त्यानंतर कपाटाचे दरवाजे उचकटून त्यातील साडेसहा लाखांचे दागिने लंपास केले.


तक्रार दाखल होताच पोलिसांनी पथके तयार केली. पोलिसांनी संशयावरून निखील पाटील आणि पायल पाटील यांना ताब्यात घेतले. त्यांच्या सांगण्यावरूनच व माहिती दिल्यावरूनच तिघांनी कट रचल्याचे समोर आले. नांद्रे, वसगडे, खटाव येथील संशयितांना ताब्यात घेतले. दोघांच्या सांगण्यावरून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 25 तोळ्याचे दागिने आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित रोहित पाटील याच्यावर नऊ, तर निखील पाटील याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.


संशयित महिला डॉक्टरांची रुग्ण
पोलिसांनी माहिती दिली, की संशयित महिला पायल पाटील ही डॉ. नाडकर्णी यांची पूर्वीची रुग्ण आहे. डॉ. नाडकर्णी या एकट्याच राहतात. एवढ्या मोठ्या बंगल्यात त्या एकट्याच राहत असल्याची रेकी पायल पाटील आणि निखिल पाटील यांनी केली होती. बँकेच्या लॉकरमधून दागिने काढून आणल्यानंतर पायल आणि निखिल पाटील यांनी तिघांच्या मदतीने लूटमारीचा कट रचला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -