कोरोना महामारीमुळे (Covid-19) गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र भयावह (Corona Pandemic) परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे लक्षात घेत राज्यात (Maharashtra) कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. अशात चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार कोरोनाचा (Coronavirus) सौम्य किंवा माध्यम संसर्गामुळे देखील पुरुषांच्या प्रजनन प्रणालीशी संबंधित प्रथिनांच्या पातळीत बदल हाऊ शकतो.
मुंबईच्या इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Mumbai) संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात एससीएस ओमेगा या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात कोरोनामधून बरे झालेल्या पुरुषांच्या वीर्यामधील प्रथिनांच्या पातळीचे विश्लेषण करण्यात आले. या संशोधनानुसार SARS-CoV-2 या विषाणूमुळे कोरोना होतो. हा विषाणू श्वसन यंत्रणेवर परिणाम करतो. हा विषाणू आणि या विषाणूला शरीराकडून देण्यात येणाऱ्या प्रतिसादामुळे इतर उतींना देखील नुकसान पोहचू शकते.
यासह ‘कोरोना विषाणू पुरुषांची प्रजनन क्षमता कमी करू शकतो’. शिवाय हा विषाणू पुरुषांच्या पुनरुत्पादक अवयवांमध्ये देखील आढळला आहे असे, संशोधनात म्हटले आहे. या संशोधनात मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने सहभाग घेतला होता.
कोरोनाचा पुरुष प्रजनन प्रणालीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो का? यावर संशोधकांनी अभ्यास केला. यासाठी टीमने 10 निरोगी पुरुषांच्या वीर्यामधील प्रथिनांची पातळी आणि नुकतेच कोरोनाची सौम्य आणि माध्यम संसर्गातून बरे झालेल्या 17 पुरुषांच्या वीर्यामधील प्रथिनांच्या पातळीची तुलना केली. सर्व पुरुष 20 ते 45 वयोगटातील होते. या संशोधनामुळे असे आढळून आले की, कोरोनाची लागण होत उपचारानंतर बरे झालेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या खूपच कमी आढळून आली. यासह कोरोनातून बरे झालेल्या पुरुषांच्या वीर्यतील प्रथिनांच्या पातळीतही बदल झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
एकीकडे कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने दिलासा मिळत असताना IIT मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातील हा दावा नागरिकांची चिंता वाढविणार आहे.