आधुनिक जीवनशैलीमध्ये लोकांनी स्वतःला कामात इतके झोकून दिलेले असते की, त्यांना इतर कोणत्याही गोष्टी लक्षात राहात नाहीत. कामाचा ताण, दिवसभर थकल्यानंतर घरी आल्यावर काही जण न खाता-पिताच झोपतात; तर काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने रात्री जेवतच नाहीत; पण उपाशीपोटी झोपण्याची सवय आरोग्याचे खूप नुकसान करते.
उपाशीपोटी झोपल्याने अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. रात्री शरीराला फारशा कॅलरींची गरज नाही असे अनेकांना वाटते; पण शरीर 24 तास ऊर्जा निर्माण करत असते आणि दरवेळी कॅलरी जाळण्याचे कामही करते. त्यामुळे शरीराला पोषक घटकांची गरज असतेच.
अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी प्रोटिन शेक घेतात. त्यांना इतरांच्या तुलनेत अधिक ऊर्जावान वाटते. याउलट उपाशी पोटी झोपल्यास दुसर्याी दिवशी थकवा येतो. काम करण्याची क्षमता प्रभावित होते. ज्या लोकांना रात्री न जेवता झोपण्याची सवय आहे त्यांच्या चयापचय क्षमतेवर वाईट परिणाम होतो. रिकाम्या पोटी झोपल्याने कोलेस्ट्रॉल आणि थायरॉईड पातळी बिघडते.
उपाशी पोटी झोपल्यास रात्री उशिरा पोटात वेदना होऊन झोपेत अडथळा निर्माण होतो. स्थूलपणाने अनेकजण ग्रस्त आणि त्रस्तही असतात. रात्री उपाशी पोटी झोपल्यास वजन लवकर कमी होईल असे वाटते; पण हा समज चुकीचा आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी हलका आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही फळे, सॅलड किंवा ज्वारीची एक भाकरी आणि पालेभाजी असा आहार घेऊ शकता. रात्रीच्या वेळी पचण्यास जड आहार घेणे टाळावे.