म्हाडाने एक मार्च रोजी काढलेल्या सदनिका सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार- वारस यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ९ ऑक्टोबर पर्यंत ३० दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगार- वारस यांना पाठवण्यात आलेल्या प्रथम सुचना पत्रानुसार मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुंबई शाखेमध्ये कागदपत्रे सादर करण्यासाठी १२ जुलै२०२१ ते ०९ सप्टेंबर २०२१ पर्यंत ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला.
मात्र, बहुतांश गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी या कालावधीमध्ये कागदपत्र सादर केलेली नाहीत.
तसेच सोडतीमधील यशस्वी अर्जदारांना पाठवण्यात आलेल्या प्रथम सूचना पत्रांपैकी काही पत्रे विविध कारणांमुळे पोस्टाकडून परत आली आहेत.
पोस्टाकडून परत आलेल्या प्रथम सूचना पत्रांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच महाराष्ट्रात मध्यंतरी आलेल्या पूर परिस्थितीचा विचार करता यशस्वी अर्जदारांना ३० दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
ज्यांनी बँकेमध्ये कागदपत्रे सादर केले नाहीत तसेच विविध कारणांमुळे पोस्टाकडून परत आलेले प्रथम सूचना पत्र वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी, गिरणी कामगार कक्ष, मुंबई मंडळ, कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला या कार्यालयातून स्वीकारावीत.
त्यानंतर मुंबई बँकेच्या मुंबईस्थित शाखेमध्ये ९ ऑक्टोबर२०२१ पूर्वी सादर करावीत, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.