“राज्यात हल्ली अंधभक्तांचा सुळसुळाट झाला असून सगळीकडे उदोउदो सुरू झाला आहे. भक्त म्हणजे अंधभक्त नाही. अंधभक्तांचा हल्ली सुळसुळाट आहे. अंधभक्त काही काही वेळेला दैवत बदलू शकतो; पण भक्त हा आपल्या दैवताच्या विचारांवर आयुष्यभराची वाटचाल करतो”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपाला लगावला.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी कॉन्टेनपररी रिलिवन्स’ या पुस्तकाचा प्रकाशन साेहळा वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबईवरून उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ घटनाच लिहिली असे नाही तर त्यांनी पुढे निर्माण होणाऱ्या अडचणी अडथळे दाखविले. त्या अडथळ्यांवर उपाय सूचविले. ज्ञानाचा अथांग सागर असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वकालीन मार्गदर्शक आहे. जेव्हा तुम्ही थांबता. काय करावे समजत नाही. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरतात”.








