वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास सर्वसामान्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करत ठराविक रुपयांचा दंडही घेतला जातो. सर्व सामान्यांसह आता पोलिसांकडून मंत्री, नेत्यांवरही कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना दंड केलेला आहे. पवारांच्या दोन वाहनांवर तब्बल 27 हजार 800 रुपयांचा दंड केला असून त्यांनी नुकतीच सर्व रक्कम ऑनलाईन भरली आहे.
वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अजित पवारांसह भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहितेपाटील, जिल्ह्यात सर्वाधिक वाहने वापरणारे आमदार सुनील शेळके यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे सर्वाधिक दंड भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर करण्यात आलेला आहे. तर दिलीप वळसे-पाटील यांना 5 हजार 200 रुपये, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे 600 रुपये दंड आकारण्यात आला आहे. सर्व नेत्यांच्या वाहनांवर अनेक प्रकारची चलने पेंडिंग आहेत.