शरीरसंबंधाची व्हिडीओ क्लिप प्रसारित करून महिलेकडे पैशाची मागणी करणार्या भगवानसिंग रामसिंग ठाकूर (वय 31, रा. बेन चिंचोली, ता. हुमणाबाद, कर्नाटक) याला दोषी धरून न्यायाधीश एस. एस. चंदगडे यांनी दीड वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तीन वर्षापूर्वी हा प्रकार घडला होता.
संशयित भगवानसिंग हा एका कारखान्यात कामाला होता. नोव्हेंबर 2017 ते जून 2019 या कालावधीत भगवानसिंग याने पीडित महिलेशी शरीरसंंबंध ठेवले होते. त्याने शरीरसंंबंधाच्या व्हिडीओ क्लिप बनविल्या होत्या. त्या व्हिडीओ क्लिप पीडित महिलेच्या पतीला, मुलाला, नातेवाईकांच्या मोबाईलवर प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली होती. व्हिडीओ क्लिप नष्ट करण्यासाठी त्याने पीडित महिलेकडे 2 लाखाची मागणी केली होती. पैसे न दिल्याने त्याने व्हिडीओ क्लिप पीडित महिलेच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविल्या होत्या.
त्यामुळे महिलेने येथील पोलिस ठाण्यात भगवानसिंग याच्याविरोधात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी भगवानसिंग याच्याविरोधात येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश चंदगडे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात फिर्यादी, पंच, फिर्यादीचा मुलगा, तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार भगवानसिंग याला दोषी धरून दीड वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील शुभांगी पाटील, रणजित पाटील यांनी काम पाहिले. सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत शितोळे, पोलिस सुनील पाटील यांनी सरकारी पक्षास मदत केली.