कोरोना असू की एसटी कर्मचाऱ्यांचा संप या कारणांमुळे एसटी महामंडळाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत असल्यासारखंच झालं आहे. अनेक तोडगे काढत राज्यात भरपूर ठिकाणी बस सुरू झाल्या आहेत. परंतु काही ठिकाणी अजूनही प्रवाशांचे हाल सुरुच झाले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वीच इतर पर्यायी मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे नियोजन करून जूनमध्ये प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 1 जूनला होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील एसटी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्यात या क्षणाला एसटी महामंडळात कर्मचारी आहेत, बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवासीही तयार आहेत पण गाड्या नाहीत, असं चित्र आहे. एसटीच्या (ST) तुटवड्यामुळे ग्रामीण भागात फेऱ्या पूर्णपणे सुरू झालेल्या नाही. याचा आढावा मंत्री अनिल परब यांनी कालच्या बैठकीत घेतला. यानंतर राज्यातील पहिली एसटी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. याच मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस (Electric Bus Service) अर्थात ‘शिवाई’ चालवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.
केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘फेम’ योजनेनुसार इलेक्ट्रिक बससाठी केंद्राकडून सवलत देण्यात येते. केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल एक हजार इलेक्ट्रिक बस (Electric Bus) आणि दोन हजार सीएनजीवरील बस (CNG Bus) दाखल होणार आहेत. यातील अंदाजे 150 इलेक्ट्रिक गाड्यांचा पहिला टप्पा जून महिन्यामध्ये येणार आणि यानंतर यंदाच्या वर्षाच्या शेवटी एकूण एक हजार इलेक्ट्रिक गाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी चर्चा काल झालेल्या आढावा बैठकीत
झाली आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने प्रवाशांसाठी अधिकाअधिक बसचे नियोजन करण्यासाठी एसटी महामंडळाच्या (ST Corporation) राज्यभरातील विभाग नियंत्रकांसोबत मुंबईतील मुख्यालयात आढावा बैठक काल झाली. त्यावेळी मंत्री परब म्हणाले, “गेल्या पाच महिन्यांच्या संपानंतर आपली ST पुन्हा सुरू झाली आहे. आपले कर्मचारी संपावर होते म्हणून आपण काही करू शकलो नाही. पण आता सर्व वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत होण्यासाठी विस्कळलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसण्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करावे. पुढील महिन्यापासून शाळा सुरु होतील. काही शाळांची वेळ बदललेली असेल. त्यामुळे एकाच मार्गावरील वेगवेगळ्या शाळांसाठी बदललेल्या वेळेनुसार अनेक गाड्या सोडल्या जातात. त्याऐवजी शाळांच्या वेळेचं नियोजन करून बस सोडाव्यात”, अशा सूचनाही परब यांनी केल्या.