राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे आता नव्या राजकीय घोषणेच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे संभाजीराजे छत्रपती लवकरच नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता 12 मे रोजी पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या खासदारकीची टर्म संपत आल्यामुळे संभाजीराजे छत्रपती आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, माझी भूमिका 12 मे रोजी स्पष्ट करणार आहे. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही, असे नाही पण जे काही बोलायचे ते मी 12 तारखेला बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर आता पुण्यात 12 मे रोजी मेळावा जाहीर करण्यातआला आहे. या मेळाव्यात संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवर ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी… नवी दिशा, नवा विचार आणि नवा पर्याय..’ असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे संभाजीराजे हे भाजपकडून पुन्हा खासदार होऊन जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.