Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगRajya Sabha Polls : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान!

Rajya Sabha Polls : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यसभेच्या 57 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी देण्यात आली. 57 जागांपैकी सर्वाधिक 11 जागा उत्तर प्रदेशातील असून त्याखालोखाल प्रत्येकी सहा जागा महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील आहेत. एकूण 15 राज्यातील 57 जागांसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडूसह आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि हरियाणा यांचा समावेश आहे.



जे खासदार राज्यसभेतून निवृत्त होत आहेत, त्यांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट या कालावधीत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका घेतल्या जात असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुका सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. राज्यसभेच्या राष्ट्रपती नियुक्त सहा जागादेखील रिक्त होत आहेत, हे विशेष.

राज्यनिहाय विचार केला तर बिहारमधील पाच, कर्नाटक, आंध्र प्रदेश व राजस्थानमधील प्रत्येकी चार, मध्य प्रदेश आणि ओडिशातील प्रत्येकी तीन, पंजाब, झारखंड, हरियाणा आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी दोन तर तेलंगणमधील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. ज्या 57 जागांवर निवडणुका होत आहेत, त्यातील 23 जागा सध्या भाजपकडे असून 8 जागा काँग्रेसकडे आहेत. तर उर्वरित जागा इतर पक्षांकडे आहेत. तामिळनाडू व पंजाबच्या विधानसभा निवडणुकात क्रमशः द्रमुक आणि आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे राज्यसभा निवडणुका पार पडल्यानंतर या सदनातील वरील पक्षांची ताकत वाढणार आहे.

महाराष्ट्रातून जे सहा सदस्य निवृत्त होत आहेत, त्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह विकास महात्मे आणि विनय सहस्त्रबुद्धे (सर्व भाजप) यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे पी. चिदम्बरम, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश आहे. विविध राज्यातील जे प्रमुख सदस्य निवृत्त होत आहेत, त्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, कपिल सिब्बल, जयराम रमेश, अंबिका सोनी आदींचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -