ताजी बातमी ऑनलाईन टीम
पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनच्या 544 क्रमांकाच्या पिलरजवळील एका इमारतीला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. आग एवढी भीषण होती की आगीने तीन मजली इमारतीला पूर्णपणे वेढले. दिल्ली पोलिसांना 4.40 वाजता पीसीआर कॉलद्वारे आगीची माहिती मिळाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुंडका दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
माध्यामांच्या माहितीनुसार, अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर सुद्धा आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ तीन मजली व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीत 26 मृतदेह सापडले आहेत. त्याचबरोबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा शोध घेणे बाकी आहे. आणखी अनेक मृतदेह सापडण्याची भीती आहे. इमारतीत अडकलेल्या ९ जखमींना संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंडका परिसरात लागलेल्या भीषण आगीतील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. इमारतीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दिल्लीचे डीसीपी समीर शर्मा म्हणाले की, बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी हजर आहेत, आम्ही आणखी अग्निशमन दलाला पाचारण केले आहे. आम्ही आतापर्यंत 5060 लोकांना वाचवले आहे.