सांगलीतील जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास मधील रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा घरात झोपला असताना कोणी नसल्याचे पाहून दुपारी दोनच्या सुमारास चाकूने गळ्यावर, पाठीत आणि पोटात वार करून निर्घृण खून करण्यात आला. जावेद नूरमहंमद गवंडी (वय ४३) असे खून झालेल्याचे नाव असून घरफोडी, जबरी चोरीसह पंधराहून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
अधिक माहिती अशी की, जावेद गवंडी हा आपल्या पत्नी व मुलासह सांगलीतील जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास मध्ये राहत होता. गवंडी याच्यावर घरफोडी, जबरी चोरीसह पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पेंटिंग काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. जावेदची पत्नी जास्मिन बरोबर बरेच दिवसापासून त्याचा वाद होत होता.. सततच्या कटकटीमुळे जास्मिन माहेरी आपल्या भावाकडे राहत होती. माझ्या पत्नीला घरी का ठेवले आहे असा जाब विचारत जास्मिनचा भाऊ तौफिक कुरणे याच्यासोबत जावेदचा वाद विकोपाला गेला होता. याबाबत कुरणे यांनी संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये जावेद विरोधात फिर्याद देखील दाखल केली होती.
शुक्रवारी सकाळी जावेद पुन्हा कुरणे यांच्या घरी जाऊन जाब विचारत असताना त्याने कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. सदरच्या प्रकारानंतर जावेद दुपारी एकटाच घरी झोपला असताना अज्ञात हल्लेखोराने याचा फायदा घेत त्याच्या मानेवर व पोटावर वार करून जावेदचा जागीच खून
केला. दुपारच्या काळात परिसरातील सर्वच लोक कामावर असल्याने हल्लेखोरास कोणीच पाहिले नाही. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे अजय सिंदकर व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक सदर ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबियांच्या हवाली केला आहे.