Monday, February 23, 2026
Homeमहाराष्ट्रया ठिकाणी तमाशाच्या गाण्यांवर नाचवल्या जातात मुली, जाणून घ्या काय आहे 'हे'...

या ठिकाणी तमाशाच्या गाण्यांवर नाचवल्या जातात मुली, जाणून घ्या काय आहे ‘हे’ प्रकरण

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातून एक बातमी समोर आली आहे. ‘रिल्स’ काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना लाल महालात नाचवले जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. राजमाता जिजाऊंच्या (Rajmata Jijau) समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे असून रिल्स डान्स करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची साक्ष देणारा लाल महाल पुन्हा चर्चेत आला आहे.

संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी ‘Zee 24 तास’ शी बोलताना सांगितले, की लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगर पालिकेकडून बंद ठेवला आहे. पुणे तसेच आसपासच्या परिसरातून अनेक पर्यटक जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे येत असतात. परंतु लाल महालात तमाशातील गाण्यांवर मुलींना नाचवून लाल महाल बदनाम केला जात आहे, असा आरोप संतोष शिंदे यांनी केला आहे.

जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. रिल्स कलाकार मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी लाल महालात शूटिंग केली. पोलिसांनी या तिघांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने मागणी केली आहे.

जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजेच लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रित करून लाल महाल बदनाम केला जात आहे. या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालवून पुणे शहर वसवलं आहे. त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणे निषेधार्ह आहे. लाल महालाचा अवमान असून तो आम्ही खपवून घेणार नाही, असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

या घाणेरड्या व्हिडिओ संदर्भात पुणे पोलिस आयुक्त, महानगरपालिका आयुक्तांकडे रितसर तक्रार करण्यात आली आहे. मात्र, पोलिस प्रशासन तक्रार दाखल करायला तयार नाही. आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. या कलाकारांवर तात्काळ गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -