ताजी बातमी ऑनलाईन टीम
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी (Petrol and Diesel Prices) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने उत्पादन शुल्कात कपात (Reduced Excise Duty) केली आहे. यामुळे पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच उज्जवला गॅस योजनेअंतर्गत (Ujjawala gas scheme) मिळणाऱ्या सिलेंडरचे दरही 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी याबाबतची माहिती दिली.
गेल्या काही महिन्यात महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे खाद्यपदार्थांबरोबरच इतरही वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे इंधन दर कमी करण्याची मागणी सतत्याने होत होती. अखेर केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करून सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात केल्याने केंद्र सरकारचे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे अर्थमंत्री म्हणाल्या.