ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; गतवर्षीपासून कोल्हापुरातील वातावरणात कमालीचे बदल पाहायला मिळत आहेत. यंदा तर उष्णतेसह मान्सूनपूर्व पावसाने नवा उच्चांक गाठला आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने तर गेल्या दशकातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तसांत तब्बल 46 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या 10 वर्षांतील मे महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी 25 मे 1961 रोजी तब्बल 163.6 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. हवामानातील बदलामुळे कोल्हापुरात असे वातावरणीय बदल पाहायला मिळत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कर्नाटकमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला आहे. गुरुवारी सायंकाळपासून शहरात तब्बल 20 तास पावसाची रिपरीप सुरू होती. या कालावधीत शहरात 56 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पावसाळ्याचा फिलिंग येत आहे. वाढते औद्योगीकरण, वाहनांची बेसुमार वाढ, जीवाश्म इंधनांचा वापर यामुळे वातावरणीय बदलाचे परिणाम शहरामध्ये दिसत आहेत. यामुळे शहरात हिट आयलँड इफेक्टचा धोका दिसत आहे. परिणामी शहरातील तापमानात आणि ग्रामीण भागातील तापमानात कमालीची तफावत पाहायला मिळत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.