ताजी बातमी ऑनलाईन टीम
ठरली जिल्ह्यातील तिसरी ग्रामपंचायत
राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतील हेरवाड ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श घालून देणारा विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेत याची राज्यभरातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अनेक ग्रामपंचायती विशेष सभा घेऊन निर्णत घेणार आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव नंतर आता पन्हाळा तालुक्यातील वाघवे ग्रामपंचायतीने सुद्धा सामाजिक क्रांतीची मशाल पुढे नेत विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.
शिवाय संबंधित कुटुंबाला एक वर्षासाठी घरफाळा आणि पाणीपट्टी माफीचीही घोषणा केली आहे. ग्रामपंचायत सरपंच प्रदीप पाटील यांच्यासह सर्वच सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून झालेल्या विशेष सभेमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी संजय पांडुरंग शेलार हे सूचक होते तर संजय नामदेव सुतार यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, अशाचप्रकारे यापुढे सुद्धा सर्वच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विधवा स्त्रियांना सन्मान मिळत रहावा अशी अपेक्षा सुद्धा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.