ताजी बातमी ऑनलाईन टीम
पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.
तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातच महापालिकेची पहिली सभा होईल, असा विश्वासही खासदार माने यांनी यावेळी दिला. पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह साकारत आहे. महानगरपालिकेला शोभेल असे सभागृह होणार आहे. ते व्हावे, यासाठी लागणारा अंदाजे ६ कोटी ३९ लाख ७१ हजारांचा निधी मिळावा, असे निवेदनात नमूद केले आहे. खासदार माने म्हणाले, इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ आणि नवीन सभागृहाला एकही रुपया कमी पडू देणार नाही.
हे सभागृह गोवा विधानसभा धर्तीवर करण्यासाठी संपूर्ण जबाबदारी घेत आहे, अश ग्वाही दिली. शिष्टमंडळात राजाभाऊ कांबळे, राज भडंगे, दीपक भोसले जगदीश कांबळे, प्रमोद कदम, डोणे अरुण कांबळे आदींचा समावेश होता.