ताजी बातमी ऑनलाईन टीम
संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही. पण ही माझी माघार नसून माझा स्वाभिमान आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी आज शुक्रवारी मुंबईत जाहीर केले.
संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी शिवसेनेने शिवबंधन बांधण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. त्यासाठी त्यांना सोमवारी (दि.२३) दुपारी बारा वाजेपर्यंत निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र, याकाळात संभाजीराजे यांनी याबाबतचा निर्णय न घेतल्याने संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पवार यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे कोणती भूमिका घेतात, त्याकडे लक्ष लागले होते. दरम्यान, संभाजीराजेंनी मुंबई मराठी पत्रकार संघात सकाळी ११ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढील वाटचालीविषयी दिशा स्पष्ट केली.
शिवसेनेत प्रवेश करावा, उमेदवारी जाहीर करु, अशी ऑफर शिवसेनेने दिली होती. पण मी शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही. मला घोडेबाजार करायचा नाही. मला सर्व पक्षांनी मदत करावी, अशी मला अपेक्षा होती. माझ्यासाठी खासदारकी महत्वाची नाही. माझ्यासाठी माझा विचार आणि जनता महत्वाची असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे.