इस्लामपूर येथील विनापरवाना सुरू असलेल्या सोयाबीन बियाणे पँकिंग कंपनीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. या छाप्यात २३ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या २५ किलो वजनाच्या सोयाबीन बीयानांच्या ४२३ बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोघा जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रणव गोविंद हसबनीस , गोविंद नारायण हसबनीस (दोघे रा. इस्लामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर तालुक्यात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, विना परवाना केडीएस जातीच्या सोयाबीन बियानांचे पॅकिंग सुरु असलेची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने या ठिकाणावर छापा टाकला. त्यावेळी या ठिकाणी महिला कामगारांच्या मदतीने सोयाबीन बियाणांच्या बॅग पॅकिंग करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. या बॅग ‘गरुड सिडस्’ या कंपनीच्या नावाखाली तयार करण्यात येत होत्या. यासाठीचा कृषी विभागाचा लागणारा कोणताही परवाना त्यांनी घेतला नसल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने सर्व बियानांचा साठा ताब्यात घेतला. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी सांगितले. याप्रकरणी पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय बुवा यांनी फिर्याद दिली आहे. या छाप्यात २३ लाख ५३ हजार किमतीचा १० हजार ५७५ कि.लो. सोयाबीन बियानांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.