ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला याच्या
खून प्रकरणात पुण्यातील आंबेगाव येथील संतोष जाधव आणि जुन्नर येथील सौरभ महाकाळ यांची नावे पुढे आली आहेत. या खुनाचा मुख्य सूत्रधार असलेला लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार जेलमध्ये आहे. तिहार जेलमधून तो ७०० च्यावर गुन्हेगारांची टोळी चालवतो. फक्त ३२ वर्षांचा असलेला लॉरेन्स बिश्नोईचा गुन्हेगारी जगतातील उदय हा मतीगुंग करणार असाच आहे.
विशेष म्हणजे लॉरेन्स बिश्नोई त्याची गँग तिहार जेलमधून चालवतो. द प्रिंट या वेबसाईटने लॉरेन्स बिश्नोई याच्या संदर्भातील पोलीस स्टेशनमधील कागदपत्रे तपासून एक सविस्तर वृत्तच दिलेले आहे. त्यात लॉरेन्स बिश्नोईच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
बिश्नोई २०११ आणि २०१२ या कालावधीत पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. त्या काळात त्याचा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध येऊ लागला. बिश्नोईचे गुन्हेगारीतील नेटवर्किंग अत्यंत तगडे मानले जाते. पंजाब विद्यापीठाच्या काही निवडणुकांत मारामाऱ्या, गोळीबार करणे असे प्रकार त्याने केले होते.