दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ५ टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यांत भारताच्या काही खेळाडूंनी निराशाजनक प्रदर्शन केले. त्यामुळे रविवारी (१२ जून) होणाऱ्या सामन्यांत या दोन खेळाडूंना संघाबाहेर राहण्यास लागू शकते.
राहुल द्रविड (Rahul Dravid) एक असा प्रशिक्षक म्हणून ओळखला जातो जो संघात जास्त छेडछाड आणि बदलावर विश्वास ठेवत नाही. पण, ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेने दिल्लीतील पहिल्या टी२० मध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य सहज पार केले, त्यानंतर रविवारी (१२ जून) कटक येथे होणाऱ्या दुसऱ्या टी२० मध्ये द्रविडने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला असेल. विशेषत: या सामन्यात भारताने ज्या प्रकारे शेवटच्या षटकांत गोलंदाजी केली, त्यानंतर वेगवान गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता आहे. असे झाले तर उमरान मलिक किंवा अर्शदीप सिंग या दोघांपैकी एकाचे पदार्पण कटकमध्ये होऊ शकते.
उमरान किंवा अर्शदीप करणार पदार्पण
अनुभवाच्या आधारे भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दुसऱ्या टी२० मध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील. आवेश खानने (Avesh Khan) पहिल्या टी२० मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, त्यामुळे त्याची जागा निश्चित झाली आहे. अशा स्थितीत हर्षल पटेलला दुसऱ्या टी२०मध्ये बाहेर बसावे लागू शकते. प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी हा निर्णय घेतल्यास हर्षलच्या जागी उमरान मलिक किंवा अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते.
रवि बिश्नोईला संघात मिळू शकते स्थान
दुसरीकडे, फिरकी गोलंदाजी आक्रमणातही बदल होऊ शकतो. अक्षर पटेलने पहिल्या टी२० मध्ये खराब गोलंदाजी केली आणि ४ षटकात ४० धावा दिल्या. अशा परिस्थितीत युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला संधी दिली जाऊ शकते.
दरम्यान, रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत, ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या सलामीच्या जोडीने पहिल्या टी२० मध्येही भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली होती. हीच जोडी दुसऱ्या टी२० मध्येही उतरणार आहे. श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या मधल्या फळीत राहतील. त्याचबरोबर दिनेश कार्तिक मॅच फिनिशरच्या भूमिकेत दिसतील.